बिअर शॉपी रद्दच्या मागणीसाठी आमदार कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक
उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही हद्दीत नसताना दोड्याळ ग्रामपंचायतीने अक्कलकोट शहरालगत बिअर शॉपीला परवानगी दिल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विधानसभेत आक्रमक होताना पाहायला मिळाले. या मुद्द्यावर त्यांनी लक्षवेधी मांडताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि उपमुख्यमंत्र्यांकडून उत्तर मागितले.याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसह या मुद्द्याने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
अक्कलकोट शहरात बियर शॉपीस उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर परवानगी दिली आहे.ती रद्द करावी ही प्रमुख मागणी त्यांची होती. या प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीकडून दिशाभूल करून कागदपत्रे मिळवून या शॉपीला परवानगी देण्यात आली आहे हे सर्व सिद्ध झालेले असताना अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या बिअर शॉपीमुळे लोकमंगल विहार, पिरजादे प्लॉटिंग तसेच बासलेगाव रोड परिसरातील रहिवाशांना याचा अधिक त्रास होत आहे.त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केलेली आहे असे असताना या बिअर शॉपीला अभय दिले जात आहे,असा आरोप स्थानिकांचा देखील आहे.त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंबंधी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडून संबंधित दोषी अधिकारी आणि बियर शॉपी मालकांवर कारवाई करणार का ? अशी मागणी केली.या लक्षवेधी सूचनेवर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासंबंधी सूचना करणार असल्याचे स्पष्ट केले.