वडिलांची आमदारकीची इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; कुरनूरच्या कार्यक्रमात गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचे प्रतिपादन
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात आता राजकारणात प्रत्येकाच्या आमदारकीच्या इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. शिंदे घराणे एकच शिल्लक आहे. माझ्या वडिलांचे म्हणजे बलभीमभाऊ शिंदे यांचे स्वप्न अजूनही अधुरे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मी झटत असून आगामी काळात आपली तालुक्याच्या राजकारणात पूर्ण ताकदीनिशी एन्ट्री राहणार आहे. तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी ताकद द्यावी, असे आवाहन धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले. कुरनूर येथे हजरत पीर सातू बाबांच्या यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी राजकिय विषयावर त्यांनी भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप काजळे हे होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच व्यंकट मोरे यांनी केले. त्यांनी गावातील महत्त्वाची विकास कामे कशी केली. पुढे काय करणार आहोत याची माहिती देत असताना आपल्या पाठीमागे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि चेअरमन दत्ता शिंदे यांची ताकद आहे, मी मागे हटणार कार्यकर्ता नाही,असे ते म्हणाले. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते आमदार झाले. त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही परंतु आम्ही गोकुळ शुगरची स्थापना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण करत आहोत. मध्यंतरीच्या काळात काही अडचणी आल्या परंतु आम्ही डगमगलो नाही. आता पूर्ण वेळ राजकारण व समाजकारण करण्याची माझी तयारी आहे.
चपळगाव मतदार संघातून यापूर्वी माझे वडील बलभीम भाऊ शिंदे हे जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य होऊन गेले. त्यानंतर ते आमदारकीच्याही अतिशय जवळ गेले परंतु ते स्वप्न अधुरे राहिले म्हणून आम्ही आता झपाट्याने कामाला लागलो आहोत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी आपल्या पाठीशी आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरती आणि तुमच्या आशीर्वादाने आपण आगामी काळात राजकीय क्षेत्रात मोठे पाऊल टाकत आहोत. कारखानदारी टिकवण्यासाठी राजकारणात राहणे गरजेचे आहे. यातूनच सर्वसामान्य माणसांचा आणि शेतकऱ्यांचा व तालुक्याचा विकास होऊ शकतो. आतापर्यंत जे जे प्रश्न तालुक्याचे प्रलंबित राहिलेत ते प्रश्न अजूनही प्रलंबितच आहेत. ते मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत ते सोडविणे हेच माझे ध्येय राहील. योग्य वेळ येताच आम्ही तुमच्यासमोर येऊ, असेही ते म्हणाले.
यावर्षीच्या गळीत हंगामाला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही योग्य दर देण्याबरोबरच त्यांचे सर्व ऊस अडचणीविना आपण कारखान्याला घेऊन जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोणाची काही अडचण असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी यात्रेतील उपस्थित भाविक व नागरिकांनी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिट्याचा गजर केला.
यावेळी शिंदे यांच्या हस्ते कुरनूर ग्रामपंचायतीच्यावतीने नवीन शर्त कमी केलेल्या दोन मालमत्ता उताऱ्याचे प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. कुरनूर ग्रामपंचायतीला नुकताच उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दलही सरपंच व्यंकट मोरे यांचा ग्रामस्थ व युवक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात तालुक्यातील काही पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड,सिद्धाराम भंडारकवठे, मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, युवा नेते राजू चव्हाण, चुंगीचे माजी सरपंच इरसंगप्पा गड्डे, उद्योगपती शाम चेंडके, जैनोद्दीन पठाण, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, उपसरपंच आयुब तांबोळी, अमर मोरे, संभाजी बेडगे, स्वामीराव सुरवसे, अभिजीत गुंड ,राजू गवळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब पाटील यांनी केले.आभार बेडगे यांनी मानले.