मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाचे बोट धरून त्यांना मंदिरात घेऊन जात असल्याचे भारतीय जनता पक्षाने छापलेले पोस्टर भावना दुखावणारे असून मोदी जणू विष्णूचे तेरावे अवतार आहेत, असा खोचक टोला शिवसेनेचे (ठाकरे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला. भाजपने या पोस्टरद्वारे कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्याची टीका त्यांनी केली.
राऊत म्हणाले, मंदिरात जाणारा प्रत्येक जण हा फक्त भक्त असतो. मोदी मात्र या देशात मंदिरात जाणारे एकमेव ‘अतिमहत्त्वाची व्यक्ती’ आहेत. धार्मिक कार्यक्रमात मोदींना विष्णूचे अवतार जाहीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रभू रामाला हाताला धरून मंदिरात नेत असल्याचा प्रकार त्यातूनच झाला आहे. हेच का भाजपचे हिंदुत्व ? २०२४ नंतर कोणाचे हिंदुत्व खरे हे दिसून येईल, असा दावाही त्यांनी केला.
राममंदिराच्या लढ्यात शिवसेना (ठाकरे) सामान्य रामभक्त म्हणून उतरली होती. बाबरी पाडली, तेव्हा भाजप कुठे होती? जबाबदारी तेव्हा बाळासाहेबांनीच घेतली होती. बाबरीचा घुमट पडताच, आता छाती बडवणारे पळून गेले होते. ज्यांनी हिंदुत्वाच्या मैदानातून पळ काढला, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला इशारा दिला. राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रणाविषयी बोलताना ते म्हणाले, की कोणत्याही स्वार्थाशिवाय आम्ही त्या लढ्यात उतरलो होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही. आम्ही आधीपासूनच अयोध्येत आहोत आणि जाऊसुद्धा.