अकोला : वृत्तसंस्था
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरला प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत स्फोटक भाषण केले.”मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इनकम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातलं का? असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी मोदींवर टिकास्त्र डागले आहे. 17 लाख हिंदू कुटुंब देश सोडून बाहेर गेले. ही माहिती खोटी आहे का हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. याशिवाय पंतप्रधानांचे कार्यालय मानवतेचे कार्यालय न राहता हे आता वसुलीचे कार्यालय झाले आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी मुसलमानाच्या विरोधात नाहीत. खऱ्या अर्थाने मोदी इथल्या हिंदूच्या विरोधात आहेत”, असा आरोप यावेळी आंबेडकरांकडून करण्यात आला.
तसेच, ”स्मार्टसिटी म्हणजे शहरातील कचरा रोज उचलला पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे विना खड्ड्याचा रस्ता असतो. पण कापसाला भाव नाही. याच्याकडे लक्ष न देता, सरकार फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालू लागले आहे. या गावातील भटक्या विमुक्त जातीतील व्यक्तीतील लोकांना सांगितले तर तो पूर्वीच्या काळात जेलमध्येच असायचा. कागदपत्र नसले तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. राज्यघटना म्हणते ज्याचा जन्म भारतात झाला तो भारतीय नागरिक आहे. हे म्हणतात, कागद दाखवा. असंतोष कसा वाढेल, माणसात भिती कशी राहिल”, असे आंबेडकर म्हणाले.