मुंबई : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीचा येत्या ४ रोजी निकाल येणार असून त्यापूर्वी कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले कि, मोदी सत्तेत येत आहेत याचा 2 दिवस आनंद घेत आहेत, 4 ला सगळे स्पष्ट होईल असा टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीचे एक्सिट पोल समोर आले आहेत. यामध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर झाल्याचे चित्र आहे. यावरूनच आज प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, ”हा एक्झिट पोल आहे. निकाल येईल तेव्हा मोदी सरकार बदललेले दिसेल. 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसतात. 10 वर्षे जनतेने सरकारचा त्रास सहन केला. विकासाची निवडणूक हरतो आहे म्हणून धर्मावर नेली, एक्झिट पोलचे निकाल बदललेले दिसतील”, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच भाजपचा पराभव निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, ”काही पोल कमी दाखवतात काही जास्त दाखवतात. आम्हला महाराष्ट्रात 35 च्या आसपास जागा मिळतील. कर्नाटकातही आम्ही पुढे राहू. मोदी सत्तेत येत आहेत याचा 2 दिवस आनंद घेत आहेत, 4 ला सगळे स्पष्ट होईल. एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांचे काम करतात. काही बरेही असतात,अनेकदा पोल चुकलेही आहे,” असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
ते म्हणाले, ”महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री हरतात तेव्हा आमचा आकडा 35 च्या वर जात आहे. काही आकडे फुगवून दाखवले जातात. अजित दादा यांना कुठेही चांगला प्रतिसाद नव्हता. यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाहीत. घर फोडणे, पक्ष फोडणे हा जो धुमाकूळ घातला त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे”, असे वडेट्टीवार म्हणाले.