मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभेसाठी तयारी देखील सुरु केली आहे. हे सर्व सुरु असतांना भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी एक सूचक विधान केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी एका ऑनलाइन मराठी वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यात त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील पराभवासह भाजपच्या राजकीय विरोधकांवर विस्तृत भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजपचा राजकीय विरोधक कोण? असा प्रश्न विचारला. तसेच या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांच्यापुढे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 पर्याय ठेवण्यात आले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय विरोध हा वैचारिक असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात जे काही राजकीय विरोधक आहेत, ते वैचारिक आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांनी मला आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका दिली तर मी 100 टक्के लग्नाला जाईन. ते माझे विरोधक नाहीत. पण पत्रिका कधी येईल हे मला ठावूक नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी शरद पवार 2016 मध्येच भाजपसोबत येणार होते असा दावाही केला. अजित पवार यांनी शरद पवारांविषयी केलेला दावा खरा आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. 2016-17 मध्ये शरद पवारांनी आम्हाला भाजपसोबत येण्याचा शब्द दिला होता. त्यासंबंधी आमची मी, देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील, तर त्यांची सुनील तटकरे, जयंत पाटील व अजित पवार अशी प्रत्येकी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या घटनाक्रमाचे दस्तावेज आजही माझ्याकडे सुरक्षित आहेत, असे ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवार तेव्हा आमच्याकडे येण्यास तयार होते. पण आता ते आमचाच भटकती आत्मा बनून छळ करण्याचा इशारा देत आहेत. ठीक आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला, तर आमच्याकडेही यासंबंधी योग्य उपाययोजना करणारे, रामबाण उपाय असणारे आयुर्वेदिक जडीबुटी असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आमचा छळ करण्याचा निर्धार केला असला तरी त्यांना करता येणार नाही. आज ते आमचे कट्टर विरोधक झालेत. पण त्यांना कायमस्वरुपी विरोधक म्हणण्याची गरज नाही, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.