मुंबई, वृत्तसंस्था
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मलिक यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे मलिक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आणि कुर्ल्यात एका महिलेची जमीन हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांनी 23 फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. पण आजारपणाच्या कारण देत अलीकडेच मलिक हे जामिनावर बाहेर आले आहे. मानखूर्द मतदारसंघातून नवाब मलिक निवडणूक लढत आहे.
आज नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण नवाब मलिक यांना तूर्तास मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मलिक यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या कोर्टा समोर सुनावणी झाली.
नवाब मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन देताना दिलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेकर्त्यांनी केला आहे. मात्र नवाब मलिक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले आहे. आरोप संदर्भात पुरावे देण्याचं कोर्टाने याचिककर्त्यांना 2 आठवड्याची मुदत दिली आहे. याचिकाकर्ता यांना पुरावे देण्यास कोर्टाने मुभा दिली आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी मुळ जामीन अर्जासोबत पुढील सुनावणी होणार आहे.