गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित; विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची नवी समीकरणे
अक्कलकोट, दि.२७ : धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला असून ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.ते राष्ट्रवादीत दाखल झाल्यास अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठक झाली असून यासाठी मुहूर्त शोधला जात आहे.आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर परिसरातील राजकारणात लक्ष घातले आहे.त्यानुषंगाने शिंदे परिवाराला
बळ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.गोकुळ शुगरचे चेअरमन स्व.भगवान शिंदे यांच्या निधनानंतर गोकुळ परिवार अडचणीत सापडला होता.
त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
स्वतः लक्ष घालून विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कारखानदारीला बळ दिले आणि आज कारखाना सुस्थितीत सुरु आहे.यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील,माजी मंत्री मधुकराव चव्हाण,तुळजापूर तालुक्याचे नेते सुनील चव्हाण यांचीही मोठी मदत मिळाली आहे.त्यामुळे ते राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.शिंदे घराणे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील असून १९९२ पासून ते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.दहिटणे गावात १९९२ पासून त्यांची आहे.शिंदे परिवारातील सदस्य आतापर्यंत अक्कलकोट बाजार समिती, जिल्हा परिषद ,पंचायत समितीवर निवडून देखील गेले आहेत.पूर्वीपासून पवार परिवाराशी त्यांचे चांगले संबंधित आहेत.१९९८ साली ज्यावेळी युनूसभाई शेख यांनी विधान परिषद निवडणूक लढवली होती.त्यावेळेस दत्ता शिंदे यांचे वडील बलभीमभाऊ शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला होता.त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार बलभीम शिंदे यांनी माघार घेतली होती.सध्या कारखानदारी क्षेत्रात गोकुळ शुगरचे नाव आहे.धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना तर सुस्थितीत आहेच शिवाय बंद असलेला दहिटणेतील स्वामी समर्थ कारखानाही शिंदे परिवार चालविण्यास घेणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.यापूर्वी त्यांनी तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी कारखानाही भाडेतत्त्वावर घेतला आहे.या सर्व घडामोडी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांना मोठा वरदहस्त आहे.जिल्ह्यातील अनेक कारखानदारांशी त्यांचा चांगला संबंध आहे.आगामी विधानपरिषद निवडणुकीचा विचार करता पवार यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस झाल्याची चर्चा आहे.माढा, माळशिरस या भागातील नेत्यांबरोबर शिंदे परिवाराचे चांगले संबंध आहेत.अक्कलकोट तालुक्यातुन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचाही त्यांना फायदा होईल,असे गणित आहे. शिंदे यांची चाललेली वाटचाल पाहता आगामी काळात अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे बळ वाढून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लवकरच पक्ष
प्रवेश होणार
याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निर्णयक्षमता आणि विकास कामांचा धडाका पाहता त्यांच्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे.हे लक्षात घेऊन गोकुळ परिवाराने हा निर्णय घेतला आहे.लवकरच आमचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे.