अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आपला हिरो हा चित्रपटातील हिरो नसायला पाहिजे. आपले खरे हिरो हे आई-वडील आहेत जोपर्यंत त्यांना आपण हिरो मानत नाही तोपर्यंत आपण हिरो होत नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.आयुष्यात आई-वडिलांना कधीही दुय्यम स्थान देऊ नका,असे भावनिक आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांनी केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे परिवाराच्यावतीने अक्कलकोट येथील टीनवाला मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.’आई वडील हेच माझे दैवत’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.प्रारंभी या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा,पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानचे प्रा.धनराज भुजबळ, माजी सरपंच अमर पाटील,ऍड.श्रीकांत पाटील,संगमनाथ डिग्गे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.यावेळी बोलताना आयोजक दिलीप सिद्धे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
अलीकडच्या काळात मुलांचे आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत आहे परिस्थिती वरचेवर बदलत चालली आहे त्यामुळे लहानपणापासूनच याची जाणीव त्यांना व्हावी यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना भारती म्हणाले,आपण कितीही मोठा झालो तरी समाजापेक्षा सगळ्यात जास्त मोठा आनंद आपल्या आई-वडिलांना होत असतो.मुलाने एखादे यश मिळवले की आई-वडिलांना जेवढा आनंद होतो तेवढा कोणालाही होत नाही याचा अनुभव एकदा घेऊन बघा.मलाही केवळ वडिलांनी कीर्तनकार आणि व्याख्याता हो असे एकदा सहज म्हटले होते त्यामुळे मी त्यांच्या इच्छेपोटी व्याख्याता आणि कीर्तनकार बनलो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे ही केवळ वडिलांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छापोटी त्यांच्या स्वप्नापोटी हे समाज परिवर्तनाचे काम करत आहे,असे प्रत्येकांनी आई-वडिलांची इच्छा पूर्ण करावी तरच आपल्याला आयुष्यात काहीतरी मिळवल्यासारखे आहे.जोपर्यंत महाराष्ट्रातील वृद्धाश्रम बंद होत नाही तोपर्यंत आपण सुधारलो असे म्हणता येत नाही त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून याची सुरुवात करावी,असेही ते म्हणाले.या कार्यक्रमासाठी कांचन सिद्धे, अंजना सिद्धे, सुनील सिद्धे, अविराज सिद्धे,शिवराज स्वामी, अरुण भुजंगे,विक्रांत पिसे,श्रीशैल चितली आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीके ग्रुप आणि आपुलकी बहुउद्देशीय संस्था तसेच नवभारत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
आई-वडिलांमध्ये फरक करू नका
आयुष्यामध्ये मोठे जरूर व्हा पण आई-वडिलांना सोडून नाही आणि जर तसे कोणी करत असेल तर आपल्या मोठेपणाला अर्थ नाही. आई आणि वडिलांमध्ये फरक करू नका.दोघेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. वेगवेगळे यासंदर्भातील उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे महत्त्व अविनाश भारती यांनी पटवून दिले.या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.