ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : दारात चारचाकी दिसल्यास लाडकी बहिण योजनेचा लाभ होणार बंद !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तुमच्या दारात चारचाकी वाहन असेल, तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाल्यास लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. ही चारचाकी महिलेच्या नावावर नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. यासाठी आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक आहे. या योजनेअतंर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरु आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत. चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती, मुलांसोबत वेगळी राहत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.

ज्या महिलांचे कुटुंब आयकर भरते अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे, ते अपात्र ठरणार आहेत. तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे, अशा महिला देखील अपात्र होणार आहेत. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!