नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये समोसा, कचोरी, नूडल्स, ब्रेड पकोडा यांसारखे खाद्यपदार्थ इथून पुढे उपलब्ध होणार नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांबाबत नोटीस जारी केली आहे. याद्वारे आरोग्याला अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यूजीसीकडून मार्गदर्शक सूचना जारी
सूचनेंतर्गत नूडल्स, ब्रेड पकोडाही आरोग्यासाठी अपायकारक
महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये फक्त सकस आहार दिला जाईल. उच्च शिक्षण संस्थांना याआधीही १० नोव्हेंबर २०१६ आणि २१ ऑगस्ट २०१८ रोजी असा सल्ला देण्यात आला होता, पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. आता देण्यात आलेली सूचना संस्थांनी इशारा समजावी. सूचनेबरहुकूम अंमलबजावणी केल्याने आपण विविध आजारांना आळा घालू शकू, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.