ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता आ.रोहित पवारांची होणार चौकशी !

मुंबई : वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात पसरवल्याप्रकरणी योगेश सावंत या युवकाला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि राम कदम यांनी विधानसभेत हे द्वेषपूर्ण वक्तव्य व समाजा-समाजात तेढ निर्माण केल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित युवक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी आहे. या घटनेमागे रोहित पवार यांचा हात आहे, असा आरोप करत शेलार-कदम यांनी विधानसभेत रोहित पवारांच्या चौकशीची मागणी केली. यावर तालिका अध्यक्षांनी रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश दिले.

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलन व एकूणच भूमिकेविषयी सरकारने एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर योगेश सावंत या युवकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्याचे आक्षेपार्ह वक्तव्य होते. याप्रकरणी अक्षय पानवलकर यांच्या तक्रारीनुसार मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देणे व दोन समाजात द्वेष निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योगेश सावंतला नवी मुंबईतून ताब्यात घेत बुधवारी अटक केली. सावंतला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार आणि राम कदम यांनी गुरुवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. योगेश सावंतचा पत्ता बारामतीजवळील कुरवलीचा आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आमदार रोहित पवार यांनी ‘सावंतला सोडून द्या असा फोन केला. त्याचे बारामती कनेक्शन आहे, त्यामागे रोहित पवार आहेत, असा दावा शेलार आणि कदम यांनी केला. यानंतर विधानसभा तालिका अध्यक्षांनी रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!