मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन केले. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. वाल्मीक कराडला अटक झाली आहे, आता मोठे मासे सापडतील, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड मंगळवारी दुपारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र, तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरून मस्साजोगचे ग्रामस्थ आणि मनोज जरांगे आक्रमक झाले आहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनीही आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. वाल्मीक कराड याला अटक झाली आहे. आता मोठे मासे सापडतील. या प्रकरणात पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. आरोपींना अटक नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मनोज जरांगे यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, चौकशी सुरु आहे. संबंध आहे की नाही, हे सिद्ध होईलच. यामध्ये जे जे येतील त्यांना सुट्टी दिली, तर महाराष्ट्र बंद पाडणार, असेही ते म्हणाले.