सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कांद्याचा भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
मागील आठवड्यात दर घसरल्याने बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सोलापूर बाजारपेठेत शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याची आवक घटली होती. शुक्रवारी जवळपास ५०० ट्रक आवक होती. मात्र, सोमवारी बाजारपेठेत ४२९ ट्रक कांदा इतकाच कांदा आला होता. त्यामुळे घसरलेला दर पुन्हा ५ हजारांवर पोहोचला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर,पुणे,सांगली जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो.
यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने करपू गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे. मागील महिन्यात कांद्याचा दर साडेआठ हजारांच्या वर गेला होता. त्यामुळे दिवाळीमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत होती.
दरम्यान,दिवाळी सणात कांद्याचा वांदा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर,सोलापूर बाजार समितीतील कांद्याचा दरही खाली आला. दिवाळीनंतर सोलापूर यार्डात आवक वाढली होती. आता पुढील काही दिवस दर पाच हजारांच्या आसपासच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.