ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात ‘महायुती’चीच सत्ता येणार ; अमित शहांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून दुसरीकडे भाजपचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी मोठ वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. विधानसभेला पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खा. धनंजय महाडिक आदी प्रमुख उपस्थित होते.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या ‘महायुती’चीच सत्ता येणार आहे. एवढेच नाही, तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून कामाला लागावे, असा कानमंत्रही शहा यांनी यावेळी दिला. दरम्यान, इचलकरंजीचे ज्येष्ठ नेते आ. प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्यासह यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल. त्यासाठी शरद पवार आणि कंपनीचा पराभव केला पाहिजे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बूथ लेव्हलच्या नाराज कार्यकर्त्यांना हेरून त्यांना भाजपकडे वळवा. विरोधी पक्षांचे बूथ कमकुवत झाल्यास भाजप अधिक मजबूत होणार आहे.

शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र, जगात सलग तीन वेळा सत्ता आणि पंतप्रधानपद मिळविलेला पक्ष म्हणजे भाजप आणि नरेंद्र मोदी आहेत. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या एकूण जागांपेक्षा यंदाच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जागा जास्त आहेत, हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाबाबत केलेला खोटा प्रचार आता जनतेला समजला आहे. त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. काँग्रेसला कमी जागा मिळूनही राहुल गांधी विजयी झाल्याच्या आविर्भावात आहेत; मग आपण सत्ता मिळवूनही निराश का? असा सवाल शहा यांनी कार्यकर्त्यांना केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!