ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल तेव्हाच… मोहन भागवतांचे मोठे विधान !

नागपूर : वृत्तसंस्था

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे. हे सांगत असताना त्यांनी, “भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे.”असे म्हटले आहे.पुढे बोलताना त्यांनी, “हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत आणि जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल तेव्हाच भारतालाही वैभव मिळेल” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर वीकली’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भागवत यांनी शेजारील देशांमध्ये हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले. याविषयी बोलताना त्यांनी,’जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही.’ असेही त्यांनी म्हटले आहे.

या मुलाखतीत मोहन भागवत यांनी, ‘हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे प्रतिष्ठेमुळे भारतालाही गौरव मिळेल.’ जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत, जरी एकेकाळी ते देखील हिंदू होते, त्यांना सोबत घेऊन जाण्याचे उदाहरण केवळ एक मजबूत हिंदू समाजच ठेवू शकतो. जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला तर स्वाभाविकपणे जगभरातील हिंदूंनाही बळ मिळेल. हे काम चालू आहे, पण अद्याप पूर्ण झालेले नाही. हळूहळू पण निश्चितच ही परिस्थिती विकसित होत आहे.”असे म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, ‘बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध यावेळी जो संताप व्यक्त झाला आहे तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. आता तिथले हिंदू स्वतः म्हणत आहेत – ‘आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू.’ हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे आणि संघटनेच्या विस्तारामुळे ही ताकद आणखी व्यापक होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी जोर देऊन सांगितले की, ‘हे ध्येय पूर्णपणे साध्य होईपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवावा लागेल.’ भागवत यांनी असेही स्पष्ट केले की संघ जगभरातील हिंदूंसाठी शक्य ते सर्व करेल, परंतु आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करताना. ते म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!