ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात शुक्रवारी होणार ‘ऑपरेशन टायगर’

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन टायगर’ सुरु असून आता नाशिक जिल्ह्यात देखील हे ऑपरेशन होणार असल्याची जोरदार चर्चा असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दि. 14 नाशिकमध्येही मोठे ऑपरेशन होणार असल्याचा गौप्यस्फोट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला.

नाशिकमधील ‘ऑपरेशन’चे श्रेय ‘डॉक्टर’ एकनाथ शिंदे यांचेच असेल असे सांगत भुसे यांनी शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या शिंदे गटात प्रवेशाचे संकेतही दिले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर आभार दौरा सुरू केला आहे. ही यात्रा शुक्रवारी (दि. १४) नाशिकमध्ये येणार आहे.

याप्रसंगी त्यांची सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी शिवसेना (शिंदे गट)च्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. ११) शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीनंतर मंत्री भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, नगरसेवक पदाची उमेदवारी हवी असेल, तर दोन हजार कार्यकर्ते आणा, असे बैठकीत सांगण्यात आल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, पत्रकार परिषदेत मंत्री भुसे यांनी हे वृत्त फेटाळून लावत, शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी कोणालाही उद्दिष्ट देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाबाबत व्यक्त केलेली नाराजी योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारावी परीक्षांबाबत ते म्हणाले की, शासनाचे धोरण परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्याचे आहे. या अभियानासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. ज्या केंद्रांमध्ये कॉपी आढळेल, त्या केंद्रांची मान्यता रद्द केली जाईल. गैरप्रकार आढळलेल्या संवेदनशील केंद्रांमधील आसन व्यवस्थेत बदल केले आहेत. शिक्षण, ग्रामविकास, महसूल आणि पोलिस विभाग परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवत आहेत. टाकेद येथील घटना दुर्दैवी असल्याचे सांगत, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, शिक्षकभरती नियमानुसारच होईल आणि कंत्राटी भरतीसंबंधीचे आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!