यवतमाळ : वृत्तसंस्था
काँग्रेसने देशावर ५५ ते ६० वर्षे राज्य केले; परंतु या काळात देशाचा विकास झाला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे विकास होऊन देश सामर्थ्यवान झाला आहे. विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नसून ते दिशाहीन आहेत, असा प्रहार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, खा. हेमंत पाटील, माजी मंत्री तथा आ. प्रा. डॉ. अशोक उईके, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. आशिष जयस्वाल, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अॅड. राजेंद्र महाडोळे, राजेंद्र डांगे, मनसेचे नेते राजू उंबरकर, वसंतघुईखेडकर, चित्तरंजन कोल्हे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, महायुतीसोबत खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी नकली असल्याचाही त्यांनी आरोप केला. शरद पवार यांनी अयोध्येतील राममंदिरात सीता नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. शरद पवार यांचा मंदिरांशी संबंध नाही. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लांची मूर्ती आहे, त्यामुळे सीता मातेची मूर्ती कशी राहणार? असा सवाल केला.
काँग्रेसने ६० वर्षे देशावर राज्य केले. मात्र विकास केला नाही. नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे मागील दहा वर्षांत दीनदलित दिव्यांग, शेतकरी, महिला यांना न्याय मिळाला. यवतमाळ-वाशीम मतदार संघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यांच्याकडे रेल्वे इंजिन नाही आणि ड्रायव्हरही नाही. दिशाहीन विरोधक आहेत, असा प्रहार करून विकासाला मत द्या, असे आवाहन फडणवीसांनी केले.