बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या माध्यमातून चांगलाच चर्चेत आला असतांना नुकतेच भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिपच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यात राजकीय चर्चेतला उत आला आहे.
माझ्या विरोधातील उमेदवारी माग घ्या, तुम्ही केलेले सहकार्य मी भविष्यात लक्षात ठेवेल आणि त्या दृष्टीकोनातून वाटचाल करेल, अशा प्रकारचे आश्वासन बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना दिले आहे. त्यांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पंकजा मुंडे या रविकांत राठोड यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत सांगत असून भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन देखील देत आहेत. या संदर्भात पंकजा मुंडे यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसले तरी सध्या बीड लोकसभा मतदारसंघात या क्लिपची चांगलीच चर्चा रंगली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आपल्या विरोधातील उमेदवाराशी अर्ज परत घेण्याबाबत चर्चा करताना या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येत आहे. या मध्ये बंजारा समाजाची मते हे मला मिळणार आहे. मात्र, रविकांत राठोड यांनी पाच-सहा हजार मते घेऊन त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे पंकजा मुंडे म्हणत आहेत. त्यामुळे राठोड यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असे पंकजा मुंडे त्यांना सांगत आहे. मात्र, ही ऑडिओ क्लिप खरी आहे की, खोटी या बाबत खुलासा झालेला नाही.
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये बंजारा समाजाचे एक लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यामुळे या समाजाची मते लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची मानली जात आहे. रविकांत राठोड यांनी देखील बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदरी अर्ज दाखल केला होता. मात्र पंकजा मुंडे यांच्या या फोन कॉल नंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्यांनी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आपण आता धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे रविकांत राठोड यांनी म्हटले आहे.