ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री मान यांना पन्नूने दिली जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना जीवे मारण्याची धमकी प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टीसचा (एसएफजे) संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूने मंगळवारी दिली आहे. मान यांची तुलना माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्याशी करीत ध्वजारोहण सोहळ्यात खलिस्तान समर्थकांनी त्यांना रोखावे, असे आवाहन पन्नूने केले. मोदी व मान यांना धमकी दिल्यानंतर गुप्तचर व तपास संस्था अॅलर्टवर आहेत. दिल्ली व पंजाबमध्ये सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पत्रकारांना ईमेलद्वारे पत्र व दोन व्हिडीओ पाठवत नरेंद्र मोदी व भगवंत मान यांना धमकी दिली. विदेशातील व पंजाबच्या तुरुंगातील गँगस्टर लोकांनी आपल्याशी संपर्क साधावा. तरुणांनी मोठ्या संख्येने एसएफजे संघटनेत सामील व्हावे, असे आवाहन पन्नूने केले. पहिल्या व्हिडीओत तो म्हणतो की, पंजाब सरकारची कायदा सुव्यवस्था सुधारण्याची मान यांची पद्धत चुकीची आहे. त्यामुळे त्यांना प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यास रोखावे. तेथील वातावरण कलुषित करून मान यांना दंडित करावे, अशी धमकी पन्नूने दिली.

३१ ऑगस्ट १९९५ रोजी बॉम्बस्फोटात हत्या झालेले बेअंत सिंग व मान एकसारखेच आहेत. तर, १९९० मध्ये बॉम्बस्फोटात मारले गेलेले तत्कालीन डीजीपी गोबिंद राम व पंजाबचे सध्याचे कार्यकारी पोलीस महासंचालक गौरव यादव सारखेच असल्याची तुलना पन्नूने आपल्या व्हिडीओत केली. भारताची राजधानी दिल्लीत खलिस्तानी समर्थकांनी काही भित्तिचित्र रंगवले आहेत. यात, २६ जानेवारीला होणाऱ्या परेडपूर्वी हल्ला करण्याची धमकी लिहिण्यात आली आहे. खलिस्तान समर्थक हदरीप सिंग निज्जरच्या हत्येचा बदला घेण्याचा एसएफजे संघटनेचा हेतू असल्याचे पन्नूने म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी सुरक्षा कवच न घेता ध्वजारोहण करण्यासाठी येऊन दाखवावे. तेव्हा आम्ही निज्जरच्या हत्येचा बदला घेऊ, असा इशारा पन्नूने दुसऱ्या व्हिडीओतून दिला. दरम्यान, पन्नूने आठ दिवसांपूर्वीच राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावरून मुस्लिम समुदायाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमांचे शत्रू असल्याचे तो म्हणाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!