नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या ‘महाविजय २०२४’ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही किंवा तसे वक्तव्य केलेले नाही. त्यांनी तसे केलेले विधान तुम्हाला सापडले असेल तर ते दाखवावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आरक्षणाच्या बाबतीत आपण अयशस्वी होतोय, असे दिसल्यानंतर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणे ही यांची सवयच आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचे राजकारण व्यवस्थित अभ्यासले तर अयशस्विततेचे खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचे, ही जुनीच पद्धत असल्याचे दिसते, असे सांगत आव्हाड म्हणाले की,
तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होता आणि तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत. पण त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकलेला नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ असे सांगितले होते. ती तारीख जवळ आली तरी आरक्षणाबाबत काहीच झालेले नाही. त्यामुळे विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. सर्व आश्वासने फेल झाल्यामुळे, आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता शरद पवार यांचे नाव घेत आहेत. पण लोकांना माहिती आहे. यात शरद पवार यांचा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.