मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे आजपासून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसला आहे. 100 रुपयांच्या कामासाठी आता 400 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कारण शासनाकडून आजपासून शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक (स्टॅम्प) बंद करण्यात येणार आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर सर्व व्यवहार करावे लागणार आहे. किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा आता पाचशे रुपयांच्या मुद्रांक घेऊन व्यवहार करावे लागणार आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसेही टाकले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडला. हो बोजा भरुन काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारचा महसूल वाढावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रासाठी दोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठी सुद्धा तीनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. 100 आणि 200 रुपयांच्या स्टॅम्पवर होणाऱ्या कामांसाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे दिल्यानंतर आता आपल्या खिशातून किती जाणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. सरकारी दस्तावेज, साधी नोटरी, बँकेतून कर्ज घ्यायचं असल्यास तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टॅम्प पेपर केला जात होता तो आता इतिहासजमा होणार आहे. आता 500 रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे.