ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित दादांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुःखद घटनेमुळे राज्य हादरून गेले असून, अजित पवार यांची अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे.

या अपघातानंतर बारामती शहर अक्षरशः सुन्न झाले आहे. अजित पवारांच्या निवासस्थानासह परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसत असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या कार्यशैलीचा, प्रशासनावरील पकडीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा उल्लेख करत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबीयांना आणि महाराष्ट्रातील जनतेला धैर्य लाभावे, अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, कणखर आणि प्रभावी नेतृत्व गमावले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे.

प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.’

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!