ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसच्या तोंडून बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा – पंतप्रधान मोदी

मुंबई वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचारसभेतून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेससह महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राचा भाजप महायुतीला आशिर्वाद आहे. भाजप महायुती आहे, तर महाराष्ट्राला गती आहे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि महायुती स्वप्न पूर्ण करणारी युती आहे. भाजप आणि महायुतीच केवळ सेवाभावाने काम करते. तुमचे स्वप्न हेच आमचे संकल्प आहेत आणि माझं आयुष्य तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित आहे. महायुती सरकार मुंबईकरांना कनेक्टिव्हिटीच्या सर्व अडचणींपासून सुटका देण्याचा प्रयत्न करत आहे. मेट्रो, लोकल, पूल, महामार्ग आणि विमानतळ असे सर्व दिशांना वेगाने विकास कामे होत आहेत. देशात आणि महाराष्ट्रात दशकांपर्यंत काँग्रेसचे सरकार होते. परंतु यांनी कधीच मुंबईला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मुंबई सतत प्रगतीच्या बाबतीत मागे राहत गेली. मुंबईचा स्वभाव प्रगतीचा, पुढे जाण्याचा आहे. परंतु काँग्रेसचा स्वभाव भ्रष्टाचाराचा आहे, देशाला मागे ढकलण्याचा आहे, विकासात अडथळा आणण्याचा आहे. यांनी अटल सेतूला विरोध केला, मेट्रोला विरोध केला.

मोदी पुढे म्हणाले की, “आम्ही डिजिटल इंडियाबाबत बोलत होतो, तेव्हा काँग्रेस आमची खिल्ली उडवत होती. असे विचार असलेले लोक मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याची भाषा करतो, परंतु काँग्रेस आणि त्यांचे सहकारी तोडण्याची भाषा करतात. महाविकास आघाडी जातीच्या आधारावर लोकांमध्ये भांडणं लावत आहे. काँग्रेस दलीत, मागास आणि आदिवासींचा तिरस्कार करते. एसी, एसटी ओबीसींची एकजुटता तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या जातींना आपापसात लढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जातीजातीत जेवढी फूट पडेल तेवढी काँग्रेस मजबूत होईल आणि तुमचे आरक्षण हिसकावून घेईल”.

मोदी पुढे म्हणाले “काँग्रेस आणि त्यांचे शहजादे देशात तोडण्याची भाषणा करत आहेत. परंतु हे लक्षात ठेवा की ‘एक है, तो सेफ है’. महाविकास आघाडीत एक असा पक्ष आहे ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपले रिमोट दिले आहे. मी त्यांना विनंती केली होती की काँग्रेसच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करून दाखवा. शहजाद्यांच्या तोडूंना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करून दाखवा. सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांशी हे लोक गळाभेट घेत आहेत”, असे म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशणा साधला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!