---Advertisement---

गुंडांना राजकीय छत्रछाया? अजित पवार गटाकडून आंदेकर टोळीच्या महिलांना उमेदवारी

By team
On: December 30, 2025 6:43 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या विकासाची भाषा करणारे आणि त्यासाठीच शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेल्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट कुख्यात गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या कुटुंबाला अजित पवार गटाकडून राजकीय पाठबळ देण्यात आल्याचे समोर आले आहे. गजा मारणे याच्या पत्नीनंतर आता आयुष कोमकर हत्या प्रकरण आणि कोट्यवधींच्या खंडणी प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

आंदेकर कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या उमेदवारीबाबत पक्षाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अधिकृत घोषणा टाळत थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आंदेकर कुटुंबाच्या वकिलांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात एबी फॉर्म सादर करताच ही बाब उघडकीस आली आणि पुण्याच्या राजकारणात खळबळ माजली.

दरम्यान, बंडू आंदेकर व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी निवडणूक लढवण्यासाठी विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. “निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे,” असे नमूद करत न्यायालयाने त्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली, मात्र काही कडक अटीही घातल्या आहेत.

विशेष म्हणजे, याच दिवशी अजित पवार गटाकडून कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिला उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्याने ‘गुन्हेगारीमुक्त पुणे’ या अजित पवारांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

५ कोटी ४० लाखांच्या खंडणी प्रकरणासह हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी कशी दिली जाऊ शकते, असा संतप्त सवाल आता पुण्यातील नागरिक आणि विरोधक उपस्थित करत आहेत. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!