अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
, दि.१३ : अक्कलकोट येथील प्रसिद्ध अशा श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी किणीवाडी येथील सेवा निवृत्त शिक्षक तथा जेष्ठ सभासद प्रल्हाद जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अमर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.१३ फेब्रुवारी रोजी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे विद्यमान अध्यक्ष राजीव माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षांकडे दिला होता. त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर संस्थेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाची व सल्लागार मंडळाची बैठक घेऊन नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा हा कार्यक्रम पार पडला.नूतन अध्यक्ष निवडीबाबत संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार ऍड शरदराव फुटाणे,ऍड.सुरेशचंद्र सूर्यवंशी ,स्वामीराव पाटील,सोपानराव गोंडाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली. नूतन अध्यक्ष निवडीबाबत एकमत होत नव्हते.त्यावेळी सल्लागार मंडळाने सर्वांना विश्वासात घेऊन या निवडी केल्या.
या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद जाधव हे होते.यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष जाधव म्हणाले,माजी आमदार स्व.बी.टी माने, स्व.सर्जेराव जाधव,स्व.उध्दवराव जंगाले
यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा विस्तार झाला. अनेक माजी अध्यक्ष व सभासदांचे यात योगदान आहे.या संस्थेची स्थापना १९२७ साली झाली असून ही संस्था तालुक्यात सर्वात जुनी आणि मोठी आहे.संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी मावळते अध्यक्ष राजीव माने यांनी प्रयत्न केले.आता मी देखील सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करून संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करेन.संस्थेचे अनेक प्रश्न पुढील काळात मार्गी लावू.संस्थेला गतवैभव प्राप्त करून देऊ,असे अभिवचन त्यांनी दिले.सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला आणि सल्लागार मंडळाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,अशी ग्वाही नूतन उपाध्यक्ष शिंदे यांनी दिली.संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वच संचालकांनी स्वतः अध्यक्ष समजूनच काम करावे आणि संस्थेची प्रगती साधावी असे आवाहन माजी अध्यक्ष ऍड.शरदराव फुटाणे यांनी केले.यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष राजीव माने,विश्वस्त बाळासाहेब मोरे,संतोष जाधव – फुटाणे,तानाजी चव्हाण,सुधाकर गोंडाळ आदींची उपस्थिती होती.
संस्थेचे शिक्षक बनले अध्यक्ष !
नूतन अध्यक्ष प्रल्हाद जाधव हे १९७३ साली याच संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. एक हाडाचे शिक्षक आणि विद्यार्थी प्रेमी शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. नंतर याच संस्थेमध्ये ते विश्वस्त, उपाध्यक्ष आणि आता अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.