मुंबई : वृत्तसंस्था
शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. यावेळी पवारांनी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची संतप्त भावना त्यांनी या प्रकरणी व्यक्त केली. यामुळे महाविकास आघाडीत मोठी आदळआपट सुरू झाली आहे.त्यामुळे आता शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावरून विरोधकांच्या महाविकास आघाडीत एकच वादळ उठले आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शरद पवारांसह शिंदेंवर निशाणा साधत व्यवस्थेची भलावण करणाऱ्यांनाच व्यवस्था पुरस्कृत करते असा दावा केला आहे. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे कलुषित राजकारण पाहता ठाकरे गटाने यासंबंधी तडकाफडकी प्रतिक्रिया दिली असावी, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय राऊत यांच्या भूमिकेची पाठराखण करत शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. टिळक पुरस्कारासाठी मोदी पुण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय लोक मोदींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. Modi Go Back चे नारे देत या विरोध प्रदर्शनामध्ये NCP(SP) सुद्धा सहभागी होती. पण त्याच पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती होती. मुळात पुरस्कार देण्या-घेण्याचे गणित अत्यंत सोपे आहे. जे व्यवस्थेची भलावण करतात त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे, रोहित पवार यांनी या प्रकरणी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला.
पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असे ते म्हणालेत.