पुणे : वृत्तसंस्था
राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना नुकताच मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला असून काही दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुढील काही तासात छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडासह जोरदार पाऊस पडल्यामुळे या परिसरातील अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे. त्याशिवाय शेतीचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाली असून काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना देखील समोर आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर त्याचा परिणाम झाला आहे.
कोकण परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पावसाने कोकण किनारपट्टी परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. याचा बागायती शेतीला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून पूर्व पावसाने कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी या परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचे तसेच आंबा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांमध्ये विजेच्या कडकडासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पुढील काही तासात या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.