नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रामजन्मभूमी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० डिसेंबर रोजी रोड शो आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर रोड शो होणार असून त्यानंतर मोदी एका जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहिती रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा १५ किलोमीटरचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ वरील धर्म पथ, लता मंगेशकर चौक, राम पथ, टेढी बाजार, मोहबरा चौराहा यामार्गे अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत रोड शो असेल. रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर मोदी वंदे भारत व अमृत भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर ते रस्तामार्गे विमानतळावर परतल्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी दिली. रोड शोदरम्यान मोदी प्रवास करणाऱ्या मार्गावर ५१ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, १०० हून अधिक ठिकाणी मोदींवर पुष्पवर्षाव होणार आहे. शंखनाद व स्वस्ति वाचनादरम्यान साधुसंत मंडळी पंतप्रधानांना आशीर्वाद देतील. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी २ तास अयोध्येत असतील. या दिवशी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अयोध्येला येणारी पहिली फ्लाईट सकाळी १० वाजता उड्डाण करेल. दरम्यान, सकाळी ११ वाजून २० मिनिटाला ही फ्लाईट अयोध्येत दाखल होईल. यानंतर दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यासाठी २३ डिसेंबर ते ३ जानेवारी यादरम्यान पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.