नवी दिल्ली : प्रतिनिधी
आज देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या परेडचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन सहभागी होत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत–युरोप संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर संदेश देताना त्यांनी म्हटले, “सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हा दिवस भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. हा राष्ट्रीय सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा व उत्साह निर्माण करो आणि विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ होवो.”
पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केले. विविध क्षेत्रांतून देशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींची उत्कृष्टता, समर्पण आणि कर्तृत्व समाजाच्या रचनेला समृद्ध करत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा सन्मान येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून संपूर्ण शहर हाय अलर्टवर आहे. अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यंदाचे वर्ष विशेष ठरण्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ला १५० वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक घटनेचेही विशेष स्मरण करण्यात येणार आहे.