पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला असून पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून अनेक भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. गुरुवारी पावसामुळे शहरात अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता हा पूर ओसरला आहे. असे असले तरीही पुण्यात आजही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह ठाणे, पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून पोहोचवण्यात आलेलं नाही. तसेच वापरण्यासाठी पाणी नाही. या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत. पश्चिम बंगाल, बांगलादेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर पासून, जयपूर, ग्वालेर, सिधी, रांची, कॅनिंग ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरात, मध्य प्रदेशातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनाऱ्यावर पावसाने जोर धरला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा हाहाकार ग्रामीण भागाचा संपर्क तुटला शहरी भागातील सकल भागातील घरात पाणी शिरले. नवापूर शहरात व परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. नवापूर शहरातील जीवनदायीनी समजली जाणारी रंगावली नदी दोन्ही काठासह दुथडी भरून वाहत आहे. आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने पावसाच्या संततधार सुरू आहे नवापूर शहरातील इंदिरानगर, बजरंग चौक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा, देवळफळी, आदी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सकल भागातील घरात पाणी शिरल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा अनेक ठिकाणी पावसामुळे संपर्क तुटला आहे.वीस पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यावर झाड उलमडून पडली आहेत. सकाळी काही काळ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती.