पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागांत सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याचा फटका नवीन लाल कांद्याला बसत असल्याने या कांद्याचा हंगाम एक ते दीड महिना लांबणीवर पडला आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. या कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे नवीन पिकाचे नुकसान, तर दुसरीकडे जुन्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकूणच सहा महिन्यांपासून कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
निर्यातीत झालेली घट, दक्षिण भारतातून अपेक्षित नसलेल्या मागणीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून कांद्याला भावच मिळत नाही. त्यामुळे भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवला आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरला नवीन कांदा बाजारात येत असतो. मात्र, अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दीड महिना विलंबाने म्हणजे 15 डिसेंबरपासून नवीन कांदा मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. सध्या तुरळक प्रमाणात आवक होत आहे. त्यास नाममात्र दर मिळत आहे, तर जुना कांद्याची आवक मागील वर्षी सप्टेंबर अखेरलाच संपली होती. मात्र, यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला आहे, त्याची आवक सध्या मोठी होत आहे.
एप्रिलपासून कांद्याला कमी भाव मिळत आहेत. नवीन पिकाचे नुकसान झाले आहे. जुन्यालाही भाव मिळत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. वितरण व्यवस्था, निर्यात धोरण व्यवस्थित नसल्यामुळे हे घडत आहे. यावर त्वरित पाऊल उचलून सरकारने उपाययोजना केली पाहिजे. अशी प्रतिक्रिया कांदा व्यापारी देवू लागले आहे.