मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीआधीच विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच तब्बल 70 जागांवर एकच उमेदवार रिंगणात उरल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या बिनविरोध निवडींमध्ये महायुतीचे, विशेषतः भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा आणि वादाला तोंड फुटले आहे.
या अभूतपूर्व परिस्थितीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “माझ्या उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून येणारी निवडणूक प्रथमच पाहतोय.”
दरम्यान, बिनविरोध निवडींच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात? हे कोणत्या विकासकामांच्या आणि लोकहिताच्या कर्तृत्वावर?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीची हत्या असून, मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
निवडणूक आयोगालाही संजय राऊत यांनी लक्ष्य केले. “निवडणूक आयोग म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनलं आहे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाहीवरील जनतेचा विश्वास उडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापालिका निवडणुकांआधीच मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडींमुळे राज्यातील राजकारण तापले असून, येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.