---Advertisement---

मराठी साहित्य संमेलनात खळबळ; कार्याध्यक्षांच्या तोंडाला फासले काळे

By team
On: January 3, 2026 5:09 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा वृत्तसंस्था : साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला एका व्यक्तीने अचानक काळे फासल्याने साहित्य वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू असतानाच घडल्याने उपस्थित साहित्यिक, रसिक आणि आयोजक सर्वच स्तब्ध झाले.

शुक्रवारी सकाळी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले होते. आज दुसऱ्या दिवशी विविध सत्रे आणि कार्यक्रम सुरू असताना संदीप जाधव नावाच्या एका व्यक्तीने संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला. त्याने व्यासपीठाकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळ कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले.

या घटनेमुळे काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नेमके काय घडले हे सुरुवातीला विनोद कुलकर्णी यांनाही समजले नाही. हल्लेखोर संदीप जाधव हा रिपब्लिकन पक्षाचा (रिपाइं) कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्याने हा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी केला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामध्ये गळ्यात निळा रुमाल घातलेला संदीप जाधव ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा देताना आणि विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे काळे फासल्यानंतर तो राष्ट्रगीत म्हणताना देखील व्हिडिओत दिसत आहे.

घटनेनंतर आयोजकांनी तत्काळ हस्तक्षेप करत विनोद कुलकर्णी यांना सावरून सुरक्षित ठिकाणी नेले. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे साहित्य संमेलनाच्या शांत आणि वैचारिक वातावरणाला गालबोट लागले असून, साहित्यिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!