ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढचे ५ दिवस पावसाचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पुढील ५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान आणि कोकण आणि गोव्यात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मध्य महाराष्ट्रात ३१ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सून ट्रफ सक्रिय आहे आणि ट्रफ समुद्रसपाटीवर त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळपास आहे. पुढील ३ दिवसांत तो त्याच्या सामान्य स्थितीजवळ कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास वेग) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठाणे, पालघरसाठी ३ ऑगस्ट रोजी तर रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्गला ३१ जुलै, २ ते ३ ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिकला ३ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यात ३१ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला १ ते २ ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट राहील. चंद्रपूरमध्ये १ ऑगस्ट, गडचिरोलीत ३१ आणि १ ऑगस्ट, गोदिंयात १ ऑगस्ट आणि वर्धा जिल्ह्याला २ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!