मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात उन्हाचा तडाखा जोरदार असतांना नुकतेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आता आणखी दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. शनिवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया आणि नागपूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात रविवारी मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. तर पुणे, सातारा, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्यामुळे काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.