मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असून, पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून, यात कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाने रिमझिम का होईना हजेरी लावली. मुंबईच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात पावसाचा जोर अधिक होता. मुंबई शहर आणि उपनगरात कुठे तरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम होते. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत तीन दिस अधिक पावसाची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर सातारा परिसरात जोरदार पाऊस झाला असून पंचगंगेच्या पातळीत दिवसात ४ फुटांची वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यातही एक टीएमसीने वाढ झाली आहे.