अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गायरान जमीनीवरील अतीक्रमण काढणे संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार होण्याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल दादा बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देण्यात आले.
यावेळी अक्कलकोट शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, अक्कलकोट विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ गुड्डे, गुणवंत लवटे, वैजनाथ बंदिछोडे, योगेश जानकर, यलप्पा निंबाळकर, जयवंत कोळेकर, कोंडीबा माडकर, हुसेनी नंदिवाले यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील एकूण दोन लाख तेवीस हजार अतिक्रमणे काढण्यात यावीत असा उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसारच अनेक ग्रामपंचायतीने त्यांच्या गायरान जमिनी ह्या जमिनी नसलेल्या गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनेतून घरकुल बांधण्यासाठी दिलेल्या आहेत.
याठिकाणी रस्ते, वीज, पाणी पुरवठा या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने अब्जावधी रूपये खर्च केले आहेत. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक तसेच प्रचंड नुकसानकारक असा आहे. त्यामुळे मुंबई पुणे धर्तीवर गाव खेड्यातील गायरान जमिनीवरील अतीक्रमण नियमित करण्यात यावे आणि पुन्हा पुढील काळात अतीक्रमण रोखण्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करणे उचित ठरेल. तसेच काही गायरान जमिनी वरती जिल्हा परिषद शाळेच्या इमारती, शासकीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने हे शासनाची परवानगी घेऊनच बांधलेले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने अतिक्रमण काढणे संदर्भातील फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष या प्रश्नासाठी जन आंदोलन उभा करेल याची शासनाने नोंद घ्यावी असे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर व अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.