ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारीपासून संपावर

मुंबई : वृत्तसंस्था

डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डने यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले असल्याचे सेंट्रल मार्ड अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी सांगितले. आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत असल्याचे हेलगे यांनी सांगितले. मात्र याबाबत सरकारकडून फारशी सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत.

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची सोय नसणे, नियमित मानधनाचा अभाव अशा अनेक अडचणी निवासी डॉक्टरांना सतावत आहेत. या सर्व मागण्यांबाबत सेंट्रल मार्डने आतापर्यंत २८ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र यावर सरकारकडून केवळ तोंडी आश्वासन मिळाले आहे. या मागण्यांबाबत सरकारकडून शाब्दिक आश्वासन मिळाल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेतल्याचे डॉ. अभिजीत यांनी सांगितले. मात्र आता मागण्या मान्य झाल्यास ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेदेखील डॉ. हेलगे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!