नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सादर केला होता. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या संदर्भात बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मला दिली असती तर मी देखील चांगले काम करून दाखवले असते. राज्यातील अनेक नेत्यांनी माझ्या नावाची शिफारस केल्याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे होती, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करताना ज्या नेत्याच्या संस्था नाहीत, अशा व्यक्तीची आणि आक्रमक चेहऱ्याची निवड करावी, असा राहुल गांधी यांचा आग्रह होता. त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देखील विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून तसेच संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचे नाव अंतिम झाले आहे, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी या आधी बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळी वरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत.