छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात ‘छावा’ चित्रपट मोठ्या चर्चेत आला असताना आता लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. औरंगजेबने कसे संभाजी महाराजांना कैद केले, तसेच संभाजी महाराजांना किती क्रूरपणे त्रास दिला. असे असले तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांनी निर्भयपणे सगळे सहन करत धर्माची व स्वराज्याची विजयी पताका फडकवत ठेवली. असे सगळे असले तरी यात शिर्के घराण्याची बदनामी करण्यात आल्याचा आरोप शिर्के घराण्याने केला आहे. यात आता संभाजी ब्रिगेडनेही शिर्के घरण्याला पाठिंबा दर्शवला आहे.
शिर्के घराण्यातील सर्व कुटुंबीय पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात एकत्र जमले होते. यावेळी त्यांच्यात छावा चित्रपटाच्या विरोधात तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात लढ्याची रणनीती ठरवण्यात आली. यावेळी शिर्के कुटुंबीयांसोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते देखील हजर राहत पाठिंबा दर्शवला आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असून संभाजी ब्रिगेड स्टाइलने धडा शिकवावा लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला आहे.
चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर…
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. संतोष शिंदे म्हणाले, शिर्के यांना चित्रपटामध्ये गद्दार ठरवून दिग्दर्शकाला काय साध्य करायचे आहे? यामध्ये कुठेतरी बामणी कावा दिसतोय. एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मेव्हणे गद्दार दाखवायचे, हा प्रकार आम्हाला मान्य नाही, संभाजी ब्रिगेड अजिबात खपवून घेणार नाही. आता लढा रस्त्यावरचा सुरू होईल. चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना संतोष शिंदे म्हणाले, इतिहास घडवला मावळ्यांनी, लिहिला मनुवादी कावळ्यांनी. काही पात्रांची बदनामी करून तुम्हाला काय सध्या करायचे आहे. इतिहासचे पुर्णलेखन व्हायला पाहिजे. उतेकरांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही. छावा कादंबरी हा इतिहास नाही. कल्पनाविस्तारावर ही कादंबरी लिहिलेली आहे. उतेकरांनी पळवाट शोधू नये. जर उतेकरांनी चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळला नाही तर आम्हाला उतेकरांना शोधावे लागेल आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना धडा शिकवावा लागेल.