संगोगी ब, सातनदुधनी,कल्लप्पावाडी ग्रामपंचायतींवर प्रशासकराज
समर्थनगरला नोव्हेंबरपासून नियुक्ती, निवडणुका रखडल्याने नाराजी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.यात अक्कलकोट तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचा समावेश असून यापैकी तीन ग्रामपंचायतीवर प्रशासकराज अस्तित्वात आले आहे.
समर्थ नगर ग्रामपंचायतीवर मात्र येत्या १३ नोव्हेंबरपासून प्रशासक येणार आहे.सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्य पदाच्या निवडणुका नसल्याने प्रशासकराज अस्तित्वात आहे.दोन वर्षापासून तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत अशा स्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील,अशी अपेक्षा असतानाच प्रशासनाने पुन्हा चार ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे निर्णय घेतला आहे. यात संगोगी ब ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी ए.आर. दोडमनी,सातनदुधनी ग्रामपंचायतीवर वाय.एम पठाण, कल्लप्पावाडी ग्रामपंचायतीवर एस.ए पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
तर समर्थनगर ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी पी.एल कोळी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.समर्थ नगर ग्रामपंचायतीचा कार्यकाल अद्याप बाकी आहे.सध्या विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे पॅनल त्याठिकाणी कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२४ नंतर या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणार आहे.मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामपंचायतीची पुढील सार्वजनिक निवडणूक जो पर्यंत होत नाही व नूतन कार्यकारिणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रशासक राहील,अशा प्रकारचे लेखी आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत.प्रशासकपदी नियुक्त झालेल्या व्यक्तींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचा अधिकार आणि कर्तव्य प्राप्त होतील, अशा प्रकारची माहितीही या आदेशामध्ये देण्यात आली आहे.ज्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशा व्यक्तीकडून आपली कर्तव्य पार पाडताना झालेल्या गैरवर्तुणुकीबद्दल किंवा कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल सदर व्यक्तीला पदावरून दूर करणे किंवा प्रशासकीय कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठांना असणार आहेत. सध्याची स्थिती अशी असली तरी प्रशासक असलेल्या गावांमध्ये मात्र पुढील निवडणुकांच्या तारखेची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
नागरिकांची कामे खोळंबणार नाहीत
निवडणुका होईपर्यंत प्रशासनाने तात्पुरती केलेली सोय आहे. पूर्वी ज्या पद्धतीने कामे होत होती. त्याच पद्धतीने काम होणार आहेत. नागरिकांची कोणत्याही प्रकारची कामे खोळंबणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे.
शंकर कवीतके,गटविकास अधिकारी