ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चुंगीच्या सरपंच सारिका चव्हाण यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील  चुंगी येथील कार्यतत्पर सरपंच सारिका चव्हाण यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. टॅलेंट कट्टा व नालंदा ऑर्गनायजेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन, पुणे येथे पार पडलेल्या पुरस्कार सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक ठोस उपाययोजना राबवल्या आहेत. विशेषतः दलित वस्ती विकास योजना, भूमिगत गटारीद्वारे सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सिमेंट रस्त्यांची उभारणी यांसारखी कामे प्रभावीपणे अंमलात आणली.महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी महिला बचत गट, ग्रामसंघ व कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने विविध उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. त्यामध्ये वेफर्स, लोणचं, चटणी, भाकरी, पापड, बिस्किट, उदबत्ती, शेवया निर्मिती, डाळ मिल, पिठाची गिरणी, गांडूळ खत, परसबाग, डेअरी व शेळीपालन, कुक्कुटपालन, किराणा व सौंदर्य प्रसाधने विक्री यांसह अनेक उपक्रम समाविष्ट आहेत.ग्रामसंघाच्या अध्यक्षा आणि अठरा गावांच्या प्रभाग संघाच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत असून, तीस बचत गटांतील तीनशेहून अधिक महिलांना सीआयएफ अंतर्गत कर्जपुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत पुरवली आहे.

हा पुरस्कार फाउंडेशचे अध्यक्ष अश्विनी जाधव,चित्रपट निर्माते नितीन धावणे पाटील, एआरजे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन जितेंद्र दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सारिका चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा सन्मान गावासाठी आणि इतर सरपंचांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!