---Advertisement---

सावरकरांना भारतरत्न द्यायलाच हवे”; विधानपरिषदेत जोरदार मागणी

By team
On: February 26, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: वृत्तसंस्था 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी आज विधानपरिषदेत करण्यात आली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक संकेत दिले असून, यासंदर्भातील ठराव लवकरच सभागृहात मांडला जाईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज सावरकरांची पुण्यतिथी असल्याने विधानपरिषदेच्या सभागृहात त्यांच्या कार्याची, बलिदानाची आणि विचारांची आठवण करून देण्यात आली. यावेळी बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले, “आज राज्यात आणि केंद्रात सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांचे अनुकरण करणारे सरकार आहे. त्यामुळे या सभागृहाने एकमताने ठराव मंजूर करून सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवावी.”

या मागणीवर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, “यासंदर्भातील प्रस्ताव सभापती महोदयांकडे मांडला जाईल. शासनाला असा प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळातून सावरकरांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी अधिकृत कार्यवाही सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. गेल्या दशकभरात केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही हा सन्मान अद्याप जाहीर न झाल्याबाबत विविध संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. विरोधकांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेष म्हणजे, २०१९ च्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की भारतरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही औपचारिक शिफारसीची तांत्रिक गरज नसते आणि सरकार शिफारसीशिवायही हा सन्मान जाहीर करू शकते. तरीदेखील जनभावना आणि विधिमंडळाचा ठराव या माध्यमातून हा प्रस्ताव पुन्हा केंद्राच्या पटलावर नेण्याची तयारी राज्य सरकारकडून दर्शवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!