मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच..? मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले वाचा सविस्तर..
गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गडचिरोली जिल्हा दोऱ्यावर आहेत. ते नक्षलगरास्त भागातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तिथे ते अर्धा तास दिवाळी साजरी करतील. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनजागरण मेळाव्यात स्थानिक आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीकडे जाण्यापूर्वी नागपूर विमान तळावर प्रसारमाध्यमाशी संवाद साधला, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येक गोष्ट योग्यवेळी होत असते, मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तारही होणारच आहे. या विस्तारात मात्र सर्वांचा विचार केला जाणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. त्यामुळं आता राज्यातील दुसरा कॅबिनेट विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदारांची नाराजी चव्हाट्यावर आली होती. त्यात आमदार संजय शिरसाट यांच्यासह अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय भाजपमधीलही काही आमदारांना मंत्रिपदाची आस लागलेली असल्यानं आता पुढच्या विस्तारात कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.