---Advertisement---

अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्यावर कुमठे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By team
On: November 15, 2025 9:16 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गाव कुमठे येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसागराने आपल्या लाडक्या नेत्याला साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांचे आधारवड असलेल्या सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुमठे येथे आणण्यात आले असता गावातून आणि परिसरातून जनसागर उसळला. अक्कलकोटसह राज्याच्या विविध भागांतून लोक मोठ्या संख्येने दाखल झाले. सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. पाटील कुटुंबीयांना सांत्वन करताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.

शेतकरी, वंचित, व कमजोर घटकांसाठी आयुष्यभर झटणारा आणि अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणारा नेता आज आपल्यात नाही, याची जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट होती. गावभर शोकाचे वातावरण पसरले होते.

या वेळी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विविध मठांचे स्वामीजी, कर्नाटकचे कृषी व पणन मंत्री शिवानंद पाटील, अनेक आमदार, माजी मंत्री, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, सोसायटीचे चेअरमन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी लोकनेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर कुमठे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि उपस्थित जनतेने अश्रूपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!