राळेग़णसिद्धी : राज्यातील जनतेची मते जाणून घेतल्यानंतर किराणा दुकानातून वाइन विक्रीसाठी परवानगी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याच्या सरकारच्या या निर्णयाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिवांनी लेखी स्वरूपात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिली. या नंतर वाइन विक्रीच्या निर्णया विरोधातील उपोषण अण्णा हजारे यांनी स्थगित केले आहे.
वाइन विक्री धोरणाचा प्रारूप मसुदा जनतेसाठी खुला करून त्यावर हरकती, जनतेची मते मागविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अण्णा हजारे यांना उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी काल दिली. सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपले ५० टक्के समाधान झाल्याचे सांगत हजारे यांनी उपोषण संदर्भात ग्रामसभेत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रविवारी झालेल्या ग्रामसभेत हजारे यांनी उपोषणाचा निर्णय स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.