चंद्रपूर : वृत्तसंस्था
देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह सुरु असतांना याच दिवशी चंद्रपुरातील महादेवाच्या मंदिरामध्ये जत्रेचे स्वरूप आले असताना वैनगंगा व वर्धा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपूर शहरातील तीन सख्ख्या बहिणींचा, तर वर्धा नदीपात्रात चुनाळा येथील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वैनगंगेच्या पात्रात बुडालेल्या दोन बहिणींचे मृतदेह आढळले असून, एकीचा शोध घेतला जात आहे. तर वर्धा नदीपात्रात बुडालेल्या तीन युवकांपैकी दोघांचा मृतदेह आढळला असून, एकाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. या दोन्ही घटना बुधवारी ) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिमा मंडल (२२), कविता मंडल (२०) व लिपिका मंडल (२०) अशी चंद्रपुरातील, तर तुषार शालिक आत्राम (१७), मंगेश बंडू चनकापुरे (२०), अनिकेत शंकर कोडापे (१८) अशी चुनाळा येथील मृतांची नावे आहेत. महाशिवरात्रीनिमित्त नागरिक नदीपात्रात पवित्र स्नानासाठी जात असून, बुधवारी चंद्रपूर शहरातील मंडल कुटुंबातील आठ सदस्य गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे भरणाऱ्या यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान, व्याहाड (बुज.) येथील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाजवळ सकाळी ११ वाजल्यापासून नदीपात्रात बसले असताना काही वेळाने अंघोळीसाठी पाण्यात उतरले. अंघोळ केल्यानंतर मार्कंडा येथे जाण्याचा त्यांचा बेत असताना पाण्यात उतरलेल्यांपैकी एक महिला व चार वर्षीय बालक प्रवाहात वाहू लागले. त्यामुळे प्रतिमा मंडल, कविता मंडल व लिपिका मंडल या तीन बहिणी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र, तीनही सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर सुरुवातीला प्रवाहात वाहून गेलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सावली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच काही वेळाने बचाव कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, वृत्त लिहीस्तोवर दोघींचे मृतदेह बाहेर काढले असून, एकीचा शोध घेतला जात आहे.
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील नागरिकांसोबत महाशिवरात्रीनिमित्त काही युवक वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, नदीघाटावर एका बाजूला महिला अंघोळ करत असल्याने त्यांच्यापासून काही दूर अंतरावर अंघोळीसाठी युवक गेले होते. परंतु, त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते बुडायला लागले. यावेळी त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे जवळच असलेल्या रामचंद्र रागी या युवकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश आले नाही. या घटनेची माहिती चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी राजुरा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनास्थळ बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बल्लारपूर बल्लारपूरचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त मोहिमेतून बोटीद्वारे बुडालेल्या युवकांचा शोध घेतला जात असताना दोघांचे मृतदेह मिळाल्याची माहिती आहे. तर एका युवकाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.