पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने कॅब मधून उडी मारली तसेच थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासासाठी कॅब बुक केली होती. त्यानंतर संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. या दरम्यान गाडी चालवत असताना आरोपी ड्रायव्हर तरुणाने रियल व्हिव्ह मिरर मधून महिलेकडे पाहून हस्त मैथुन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक देखील केली आहे. खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेला माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी आहे. तो नुकताच मुंबईवरून पिंपरी चिंचवड येथे कामासाठी आला होता. पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच महिलांच्या सुरक्षेबाबत घडत असलेल्या घटनेमुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.