कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यात नुकताच ‘छावा‘ चित्रपट सुरु असून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभत असतांना आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, साधारण १२ वाजता धमकीचा फोन आला होता. ती व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून संबंधितावर कारवाई करावी. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा. मुख्यमंत्री फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे. माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत. संभाजी महाराज यांचा इतिहास मी कसा बदलू. इतिहासाचे दाखले ब्रिटिश काळापासून आहेत. खोटा इतिहास, घाणेरडा इतिहास सांगावा, अशी त्याची इच्छा आहे. पण, खोटा इतिहास आम्ही का सांगू, त्या-त्या वेळी ते मुद्दे खोडून काढले आहेत, असे सावंत म्हणाले.
दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन तुमची औकात दाखवली, हिशोबात रहा. संभाजी ब्रिगेड सावंत यांच्या सोबत आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर, सोडणार नाही, गाठ संभाजी ब्रिगेड‘शी आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला आहे.